27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतब्बल ५८ देशांत ओमिक्रॉन

तब्बल ५८ देशांत ओमिक्रॉन

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा : गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण जगभरात वेगाने वाढू लागले आहेत. सध्या ५८ पेक्षा अधिक देशात या व्हेरिएंटचा फैलाव झाल्याचे वृत्त आहे. खूप वेगाने या व्हेरिएंटचा प्रसार होण्याची क्षमता असल्याने पुन्हा मोठ्या संख्येने मृत्यू होणार का? अशी चिंता निर्माण झाली होती; मात्र जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी हा व्हेरिएंट जीवघेणा नसल्याची माहिती दिली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या लसींवरच या व्हेरिएंटच्या संसर्गापासून बचाव करता येईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. परिणामी जगभरातील लोकांना दिलासा मिळाला आहे.

ओमिक्रॉनच्या घातकतेविषयी आणि त्याच्यावर सध्या अस्तित्वात असलेल्या लसींच्या परिणामकारकतेबाबत अनेक संस्था संशोधन करत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांमध्ये या व्हेरिएंटबाबत कमालीची भिती निर्माण झाली आहे. अशातच बुधवारपर्यंत या व्हेरिएंटचा फैलाव जगभरातील ५८ देशात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपातकालीन विभागाचे संचालक मायकेल रियान यांना एका वृत्तसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी दिलासा दायक बातमी दिली. ओमिक्रॉन हा वेगाने प्रसार होणारा व्हेरिएंट आहे. मात्र, याआधीच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा तो जास्त घातक आहे हे दर्शवणारी कोणतीही चिन्ह दिसलेली नाहीत. सध्या जगभरात अस्तित्वात असलेल्या कोरोना लसी या व्हेरिएंटपासून देखील आपला बचाव करू शकतात, असे मायकेल यांनी स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत आलेल्या कोरोना व्हेरिएंटच्या विरोधात आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या लसी अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. मग ते कोरोनामुळे मोठे आजार होण्यापासून संरक्षण असो वा रुग्णालयात दाखल होण्यापासून बचाव असो. ओमिक्रॉनविरोधात त्या प्रभावी ठरणार नाही, हे सिद्ध करण्यासाठी सध्या कोणतेही कारण नाही, असे मायकेल यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या