नवी दिल्ली : पाकिस्तान दहशतवादाशी नाते तोडत असेल, तरच भारत चर्चेला तयार होईल, असे पुन्हा एकदा भारतीय परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी ठणकावून सांगितले.
दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेल्या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री अन्नालेना बेयरबॉक आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यात सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात जयशंकर म्हणाले, मी पाकच्या मुद्यावर बेयरबॉक यांच्याशी केलेल्या चर्चेत दहशतवादाच्या मुद्यावर चिंता बोलून दाखविली. आम्ही दहशतवादाच्या छायेत पाकशी चर्चा करू शकत नाहीत. उभय पक्षांमध्ये आज अफगाणिस्तान व इराणसह अनेक देशांवर चर्चा झाली.
तेल खरेदी हा भारताचा अंतर्गत मुद्दा
भारत आपल्या राष्ट्रीय हितांसाठी रशियासोबत आर्थिक संबंधांना बांधील आहे. या प्रकरणी पाश्चिमात्य देश दुटप्पी भूमिका घेत आहेत. यूरोपियन यूनियन सातत्याने रशियाकडून तेल व इतर संसाधनांच्या खरेदीवरून भारताला टार्गेट करीत आहेत. मुळात हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालू नये.
जर्मनीकडून तोंडभरून कौतूक
या घडामोडीत जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना म्हणाल्या, भारत हा जगातील अनेक देशांसाठी रोल मॉडेल झाला आहे. सोबतच हा देश अनेकांसाठी संवादाचा पूल बनून काम करत आहे. या देशाच्या ऐतिहासिक वारशाने मला नेहमीच प्रभावित केले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळविणे किती कठीण होते, हे या देशात आल्यावरच कळते. भारत आणि जर्मनीच्या लोकशाहीत बरेच साम्य आहे. मुल्यांची जोपासणा, मानव हक्क, स्वातंत्र, लोकशाही आणि कायद्यावरचा विश्वास या बाबींवर हे बंध आधारित आहेत.