अण्णा द्रमुकचे बडे नेते बैठकीतून बाहेर
चेन्नई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप आलेला असताना तिकडे दक्षिणेत देखील वातावरण काही ठीक दिसत नाही. ‘एआयएडीएमके’च्या सर्वसाधारण बैठकीमध्ये प्रचंड गोंधळ झाला असून बड्या नेत्यांना या बैठकीतून अपमानित होऊन बाहेर पडावे लागले आहे.
‘एआयएडीएमके’च्या जनरल कौन्सिलची बैठक आज चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्व २३ प्रस्तावित ठराव फेटाळण्यात आले. एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या बाजुने पदाधिकारी, कार्यकर्ते उभे ठाकले असून पक्षाचे नेतृत्व एका व्यक्तीकडेच देण्याची मागणी करण्यात आली. यामुळे माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि त्यांच्या समर्थकांना अपमानीत होऊन व्यासपीठ सोडून बाहेर पडावे लागले आहे.
एकच नेतृत्व हवे, यावरून झालेला गोंधळ संपत नसताना पक्षाची ही बैठक संपल्याची घोषणा करण्यात आली. तसेच पुढील बैठक ही ११ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. ओ. पनीरसेल्वम हे आमचे नेते आहेत, त्यांची निवड ही आमच्या सुप्रीमो आणि दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी केली होती.
पलानीस्वामी यांनी पक्ष आणि कार्यकर्ते ताब्यात घेण्यासाठी त्यांच्यावर गारुड करण्यासाठी पैशांच्या जोरावर प्रयत्न सुरु केले आहेत, असा आरोप तेनकासी जिल्ह्यातील कुरीविकुलम येथील पदाधिकारी एम. संगीलीपांडियन यांनी केला आहे. पलानीस्वामी यांनी आपणच पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केला आहे. ‘एआयएडीएमके’चे उप-संयोजक आर वैथिलिंगम यांनी परिषदेच्या बैठकीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. यानंतर ओ. पनीरसेल्वम यांच्यासह अनेक नेत्यांनी सभात्याग केला.