20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रतिस-या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

तिस-या लाटेसाठी नवी मुंबई महापालिका सज्ज

एकमत ऑनलाईन

नवी मुंबई : कोव्हिडच्या दुस-या लाटेत आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची जाणवलेली कमतरता लक्षात घेऊन संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या नेरुळ आणि ऐरोली या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोव्हिड उपचारार्थ आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची सक्षम सुविधा निर्मिती करण्यात येत आहे. कोव्हिडच्या तिस-या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने वाढविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधा, ऑक्सिजन प्लान्ट आणि सिलेंडर, वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, औषधे याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून नियमित बारकाईने आढावा घेतला जात आहे.

रुग्णांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्या आणि आयपीडी सेवा कुठल्याही प्रकारे खंडित होणार नाहीत याविषयी दोन्ही रुग्णालयांच्या वैद्यकीय अधिका-यांशी सविस्तर चर्चा करून आयुक्तांनी बारकाईने निरीक्षण केले. तशा प्रकारचे निर्देश वैद्यकीय अधिक्षकांना दिले. या दोन्ही रूग्णालयात वरील दोन मजल्याची कामे अखेरच्या टप्प्यात असून ती पूर्ण होताच खालील मजल्यांवर सुरू असलेल्या ओपीडी आणि आयपीडी सेवा त्या मजल्यांवर स्थलांतरित कराव्यात आणि अभियांत्रिकी विभागाने खालील मजल्यांवरील काम तत्परतेने पूर्ण करावे, असेही निर्देश आयुक्तांनी दिले. हे करीत असतानाच महानगरपालिकेच्या तुर्भे आणि बेलापूर रूग्णालयांचे सक्षमीकरण करण्याची कामे पूर्ण करावीत, असे अभियांत्रिकी विभागास निर्देशित करण्यात आले.

या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे आणि ट्रायेज क्षेत्राची व्यवस्था असेल त्याचीही पाहणी आयुक्तांनी केली. तेथील सुव्यवस्थेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. याठिकाणी एअर हँडलींग युनिट (एएचयू) बसविण्याचे काम मनुष्यबळ वाढवून एकाचवेळी सर्व युनीट्स बसविण्याची कामे समांतर सुरू ठेवून तत्परतेने पूर्ण करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एएचयू युनिटच्या रूममधील अ‍ॅकॉस्टिकचे काम काळजीपूर्वक करावे, जेणेकरून त्याच्या आवाजाचा त्रास रुग्णांना होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

गर्भवती , प्रसूती झालेल्या महिलांसाठी विशेष वॉर्ड
शहरातील बालरोग तज्ज्ञांशी विचारविनीमय करून दोन्ही रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्वतंत्र पेडियाट्रिक वॉर्ड निर्माण करण्यात येत आहे. त्याची पाहणी करताना त्यामधील अंतर्गत रचनेविषयी आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाबाधित गर्भवती आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी असलेल्या विशेष वॉर्डबाबतही सर्व सविधा परिपूर्ण असाव्यात याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. दोन्ही रुग्णालयात उभारण्यात येणा-या ऑक्सिजन टँकच्या जागांची पाहणी आयुक्तांनी केली आणि ही कामे गतीमानतेने करण्याचे निर्देशित केले. तसेच नेरूळ रूग्णालयात सुरू असलेल्या आरटी पीसीआर लॅबच्या विस्तारित कामाचीही पाहणी त्यांनी केली.

सद्यस्थितीत सामान्य रुग्णालयाचे कोव्हिड रूग्णालयात रूपांतरण कामाच्या पहिल्या टप्प्यामध्ये नेरुळ रूग्णालयात सहाव्या आणि सातव्या तसेच ऐरोली रूग्णालयात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील काम अंतिम टप्प्यात आहे. येथील कामे तत्परतेने करताना गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड करू नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. विशेषत्वाने इलेक्ट्रिकल कामे अतिशय काळजीपूर्वक करावीत, त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आगीसारखी दुर्घटना घडण्याचा धोका असतो, हे लक्षात घेऊन डोळ्यात तेल घालून कामे करावीत, अशा शब्दात आयुक्तांनी आदेश दिले. कोणतेही काम करताना वेळ आणि गुणवत्ता यांचा ताळमेळ राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या