औरंगाबाद : गेल्या आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फटे स्कॅमची चांगलीच चर्चा झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता औरंगाबाद येथे गुंतवणूकदारांची फसवणूक करणारे आणखी एक प्रकरण समोर आले असून, औरंगाबाद पोलिसांनी तीस-तीस घोटाळ््याचा मास्टरमाईंड संतोष राठोडला कन्नड येथील घरातून बेड्या ठोकल्या. त्यानंतर आज त्याला पैठण न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
औरंगाबादच्या समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी प्रकल्पात जमीन संपादित झालेल्या शेतक-यांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून संतोष राठोड या भामट्याने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणा-या सचिन उर्फ संतोष राठोड याला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल अटक केली होती. त्यानंतर आज दुपारी त्याला पैठणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शेतक-यांना खोट्या स्कीममध्ये अडकवून कोट्यवधी रुपयांना फसवले. त्या अगोदर त्याने स्वत:ला शेतक-यांसमोर खूप श्रीमंत असल्यासारखे सादर केले. अखेर त्याच्या खोटेपणाचा फुगा फुटला. त्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल होताच त्याला बेड्या ठोकण्यात औरंगाबाद पोलिसांना यश आले.आता या घोटाळ््याची व्याप्ती मोठी असल्याचा दावा करण्यात आला. अर्थात, जवळपास ३५० ते ५०० कोटींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे.
२०१६ पासून फसवणूक
२०१६ पासून त्याने लोकांना गंडवायला सुरुवात केली. त्यासाठी तो दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी जमिनी गेलेल्या भागात गेला. तिथे त्याने पैसे गुंतविण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. तसेच बिडकीन आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही लक्ष्य केले. जवळपास ३० गावातील शेतकरी त्याच्या जाळ््यात ओढले गेले. सुरुवातीला ५ टक्क्यांनी व्याजाची परतफेड करण्याची स्किम सुरू केली. त्यानंतर ती हळूहळू २५ टक्क्यांवर आणली. त्यामुळे अनेक शेतकरी आणि स्थानिक पातळीवरचे राजकारणी जाळ््यात अडकले. कोट्यवधी रुपये गुंतवलेल्या शेतक-यांना १० महिन्यांपासून परतावा मिळाला नाही. त्यामुळे शेतक-यांना देशोधडीला लागण्याची भीती आहे.
दोन आरोपी फरार
बिडकीन पोलिसांत शुक्रवारी दौलत राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संतोष राठोडसह कृष्णा एकनाथ राठोड आणि पंकज शेषराव चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यात कृष्णा राठोड आणि पंकज चव्हाण हे दोन्ही आरोपी अजून फरार आहेत.