24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयतुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी

तुकडा तांदळाच्या निर्यातीवरही बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशांतर्गत तांदळाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेशी व्यापार महानिर्देशालयाच्या वतीने याबाबत नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली. यासंबंधीची नियमावली ९ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पूर्वी ज्यांनी तांदूळ निर्यातीचे नियोजन केले आहे. अशा व्यापा-यांना या नवीन नियमातून १५ सप्टेंबरपर्यंत मुभा देण्यात आली आहे. ते १५ सप्टेंबरपर्यंत तांदूळ पाठवू शकतात. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के सीमाशुल्क लागू झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले की, तुकडा तांदळाच्या निर्यातीची श्रेणी मुक्तवरून प्रतिबंधित करण्यात आली आहे. हा नियम ९ सप्टेंबरपासून हा नियम लागू होईल. निर्यात धोरणाच्या संदर्भात विदेशी व्यापार धोरण २०१५-२०२० अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी या अधिसूचनेला लागू होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत तांदळाच्या काही मालाची निर्यात करण्यास परवानगी दिली जाणार आहे. या कालावधीत ज्यांच्या शिपमेंट्स या अधिसूचनेपूर्वी जहाजांवर सुरू झाल्या आहेत. अशाच खेपांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाणार आहे.

बिगर बासमती तांदूळावर
२० टक्के निर्यात शुल्क
सरकारने उसना तांदूळ वगळता बिगर बासमती तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावले होते. चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि तपकिरी तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. हे निर्यात शुल्क ९ सप्टेंबरपासून लागू झाले आहे.

भातशेतीचे क्षेत्र घटले
तुकडा तांदळावर निर्यातबंदी घालण्याचा निर्णय घेण्याआधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, देशातील काही राज्यांत कमी पावसामुळे भातशेतीचे क्षेत्र घटले आहे. त्याचा फटका उत्पादनावर होणार आहे. याचा विचार करून अगोदरच निर्यातबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

चीननंतर सर्वाधिक
तांदूळ उत्पादन भारतात
चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ओळखला जातो. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने २१.२ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. त्यात ३९.४ लाख टन बासमती तांदूळ होता. अधिकृत आकडेवारीनुसार या कालावधीत गैरबासमती तांदळाची निर्यात ६.११ अब्ज डॉलर्स होती. भारताने २०२१-२२ मध्ये जगातील १५० हून अधिक देशांत बिगर बासमती तांदूळ निर्यात केला.

दृष्टीक्षेपात तांदूळ
निर्यातीचा प्रवास
२०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने २१.२ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. भारताने २०२१-२२ मध्ये जगातील १५० हून अधिक देशांमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात केला आहे.

वाढत्या किमतींवर
नियंत्रणासाठी निर्णय
तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली. यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क लागत नव्हते. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तांदूळ उत्पादनाबाबत चिंता वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या