नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महिलांचे लैंगिक शोषण करणारे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर जोवर कारवाई होत नाही, तोवर एकही महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिसणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनाचा शड्डू ठोकून असलेल्या महिला खेळाडूंनी घेतली आहे. खासदार बृजभूषण यांच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतर एकवटलेल्या कुस्तीपटूंनी मैदानावर आंदोलनाचा आखाडा तयार केला.
आक्रमक झालेली कुस्तीपटू विनेश फोगाट म्हणाली, कुस्तीपटूंना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागलेल्या २० एक घटना मला माहिती आहेत. यामध्ये अनेक कोच आणि रेफरिंचा समावेश आहे. जोपर्यंत या आरोपींना शिक्षा होऊन महिलांना न्याया मिळत नाही, तोवर एकही खेळाडू आगामी कुठल्याच स्पर्धेत दिसणार नाही.
घाण तळापर्यंत पोहोचलीए : साक्षी मलिक
संपूर्ण कुस्ती फेडरशन बदलले पाहिजे. तरच भविष्यात नवे कुस्तीपटू सुरक्षित राहतील. ही शोषणाची घाण तळापर्यंत पोहोचली आहे. आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलून यातील सखोल माहिती समोर आणणार आहोत.याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
हायकोर्टात पुरावे सादर करणार : फोगाट
जर हायकोर्टाने आम्हाला निर्देश दिले तर आम्ही सर्व पुरावे सादर करु. आम्ही पंतप्रधानांकडेही सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहोत, असे विनेश फोगाट हीन स्पष्ट केले.