27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रदगदग नको, काळजी घे, तब्येतीला जप

दगदग नको, काळजी घे, तब्येतीला जप

एकमत ऑनलाईन

पंकजा मुंडे यांचा बंधू धनंजय मुंडे यांना सल्ला, रुग्णालयात जाऊन विचारपूस
मुंबई : प्रकृती अस्वास्थ्यामुळे धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल (सायंकाळी) भोवळ आल्याने त्यांची शुद्ध हरपली. त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. धनंजय मुंडे यांची प्रकृती बरी नसल्याचे कळताच अनेक नेतेमंडळींनी रुग्णालयाकडे धाव घेतली. आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर काही वेळात धनंजय मुंडे यांच्या बहीण पंकजा मुंडे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात येऊन धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस केली.

यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे, त्यांच्या छोट्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे उपस्थित होत्या. काळजी नको, दगदग नको, तब्येतीला जप, शेवटी तब्येत महत्त्वाची आहे, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला. मंत्री धनंजय मुंडे यांना काल संध्याकाळी भोवळ आल्याने ते बेशुद्ध पडले. हृदयविकाराचा झटका आल्याची अफवाही परसली. पण डॉक्टरांनी याचा इन्कार केला. धनंजय मुंडे यांची शुद्ध हरपल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीपासून अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांना भेटून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. अशातच आज सकाळीच पंकजा मुंडे यांनी आपल्या मातोश्रींसह दोन्ही बहिणींना घेऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली.

मोठ्या बहिणीच्या नात्याने पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना तब्येतीसंदर्भात सल्ला दिला. धनंजय तब्येतीला जपले पाहिजे. दगदग करू नकोस. काळजी करू नकोस. बाकी गोष्ट होत राहतील. पण तब्येतीला सांभाळणे महत्त्वाचे आहे, असे पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना सांगितले.

अजित पवारांकडून मुंडे
यांच्या तब्येतीची विचारपूस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच माध्यमांना मुंडे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. धनंजय मुंडे यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची बातमी चुकीची आहे, त्यांना भोवळ आली होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या