नवी दिल्ली : रामनवमीला देशातील अनेक भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्याने त्यावर चिंता व्यक्त होत असतानाच आज राजधानी दिल्लीत हनुमान जयंती निमित्त काढलेल्या शोभायात्रेवेळी दोन समुदायांत ंिहसाचार उसळल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागात ही घटना घडली असून दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांचाही समावेश असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात आज हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेला मोठी गर्दी होती. दरम्यान, ही शोभायात्रा सुरू असतानाच दोन समुदाय आमनेसामने उभे ठाकले. त्यात दगडफेक व जाळपोळीच्या घटनेने वातावरण चिघळले. जमावाकडून झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत स्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारी म्हणून या भागात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून समाजकंटकांवर कठोर कारवाईसाठी पावले उचलण्यात येत आहेत.