आग्राजवळ लोहमार्गावरील वीज वाहिनी तुटली, अनेक गाड्यांना विलंब
नवी दिल्ली : आग्रा स्थानकापासून काही अंतरावर लोहमार्गावरील वीजवाहिनी तुटल्याने दिल्लीहून मुंबई, पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक तब्बल ४ तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. संध्याकाळी साडेसातनंतर या मार्गावरील गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या. त्यामुळे झेलम एक्स्प्रेससह पुणे आणि मुंबईकडे येणा-या गाड्या अधिक विलंबाने धावत आहेत.
जम्मूतावी-पुणे झेलम एक्स्प्रेसने पुण्याकडे येत असलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आग्रा स्थानकाच्या जवळ असताना गाडी अचानक थांबली. सिग्नल किंवा इतर किरकोळ कारणांनी काही काळ गाडी थांबली असेल, असा प्रवाशांचा समज झाला. मात्र, अर्धा ते एक तास उलटल्यानंतरही गाडी पुढे जात नसल्याने प्रवासी हैराण झाले. त्यानंतर काही वेळाने संबंधित मार्गावरील वीजवाहिनी तुटली असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. दुपारी ही घटना घडल्यानंतर रेल्वेच्या वतीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ते पूर्ण झाल्यानंतर हळूहळू एकेक गाडी मार्गावरून रवाना करण्यात आली.
संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आग्रा परिसरातून झेलम एक्स्प्रेस हळूहळू पुढे रवाना करण्यात आली. सुमारे चार तासापर्यंत गाडीतील प्रवासी एकाच जागी अडकून पडले होते. याच मार्गावर मुंबई आणि इतर ठिकाणी जाणा-या गाड्याही अडकून पडल्या होत्या. वाहतूक पुन्हा सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पर्यटन किंवा इतर कामांसाठी जम्मू किंवा लगतच्या भागामध्ये पुण्यातून गेलेले अनेक प्रवासी झेलम एक्स्प्रेसमधून प्रवास करीत आहेत. ही गाडी शुक्रवारी (१० जून) दुपारी साडेचारच्या आसपास पुण्यात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, आता ही गाडी सुमारे चार तास उशिराने धावत आहे. त्यामुळे ती पुण्यात कधी पोहोचणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. गाडीतील अनेक प्रवाशांशी पुण्यातून त्यांचे नातलग, मित्र मोबाइलद्वारे संपर्कात आहेत.