मुंबई : आयपीएलच्या १५ व्या हंगामातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. आज झालेल्या १९ व्या सामन्यात केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये लढत झाली. या सामन्यात सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत २१६ धावांचे आव्हान उभे केलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा ४४ धावांनी विजय झाला. दुसरीकडे २१६ धावांचे लक्ष्य गाठत असताना केकेआरची चांगलीच दमछाक झाली. कोलकाता संघ पूर्ण गडी बाद होईपर्यंत फक्त १७१ धावा करु शकला. दिल्लीच्या विजयासाठी कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने चार बळी घेतले.
दिल्लीने दिलेले २१६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता संघातील श्रेयस अय्यर वगळता एकही फलंदाज चांगला खेळ करू शकला नाही. सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणेला पंचाच्या चुकीमुळे जीवदान मिळूनही तो अवघ्या आठ धावांवर झेलबाद झाला, तर व्यंकटेश अय्यरदेखील आपली जादू दाखवू शकला नाही. त्याने ८ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर झेलबाद झाल्यानंतर दुस-या विकेटसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने मात्र धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ५४ धावा केल्या.