27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रदुहेरी खून प्रकरणी ९ जणांना जन्मठेप

दुहेरी खून प्रकरणी ९ जणांना जन्मठेप

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथे शेतीच्या वादावरून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी सोमवारी हा निकाल दिला. अंबादास भवर व उद्धव भवर, अशी खून झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी प्रल्हाद आबाजी भवर, रामप्रसाद आबाजी भवर, आत्माराम प्रल्हाद भवर, बालाजी रामप्रसाद भवर, माधव प्रल्हाद भवर, नंदाबाई आत्माराम भवर, नामदेव दाजीबा घ्यार, विठ्ठल दाजीबा घ्यार, पार्वतीबाई माधव भवर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुजानबाई भवर यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली.

हिंगोली तालुक्यातील जामठी खूर्द येथील अंबादास आबाजी भवर व त्यांचा भाऊ रामप्रसाद आबाजी भवर यांच्यामध्ये त्यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतीचा वाद होता. यातून त्यांच्यात किरकोळ हाणामारीच्या घटनाही घडत होत्या. दरम्यान, २२ जानेवारी २०१६ रोजी सकाळी दहा ते अकराच्या सुमारास अंबादास भवर, उद्धव भवर, संजय भवर हे शेतात काम करत होते. यावेळी शेतात वाद उफाळून आला.

वादानंतर १० जणांनी अंबादास भवर, उद्धव भवर व संजय भवर यांना तलवारी, काठी, कु-हाडीने मारहाण करण्यात आली. यात अंबादास भवर व उद्धव भवर यांचा मृत्यू झाला, तर संजय भवर गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अयोध्याबाई उद्धव भवर (रा. जामठी खूर्द) यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात १० जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर न्यायालयात खटला सुरू होता. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. यात एकूण १७ साक्षीदार तपासले आणि युक्तिवादानंतर ९ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या