नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बिल्किस बानोला केवळ मुस्लिम असल्याने न्याय मिळाला नाही. मुस्लिमांना जीवे मारण्याची धमकी दिली जात नाही, असा एकही महिना नाही. अर्थसंकल्पातही मुस्लिम मुलांची शिष्यवृत्ती कमी केली गेली. हा अन्याय देशभर सुरू असल्यावरून ए. आय. एम. आय. एम. चे खासदार असदुद्दीन ओवैसी मोदी सरकारवर भडकले.
गरिबीमुळे मुस्लिम समाजातील २५ टक्के मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत, असे सरकारचाच डेटा म्हणतो, असे सांगत खासदार ओवेसी म्हणाले, अर्थसंकल्पात १९ टक्के अल्पसंख्याकांचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. सरकारने शिष्यवृत्ती ५६० कोटींनी कमी केली. मुस्लिमांना कायमच हिरव्या रंगाशी जोडले जाते. मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग हटवणार आणि कलिंगडावर बंदी घालणार का तुम्ही कशा कशावर बंदी घालणार असाही प्रश्न त्यांनी विचारला.चीनच्या प्रश्नावर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांनी अल्पसंख्याक या शब्दाला जन्म दिला. जे लोक देशाला चुना लावत पैसे खाऊन पळून गेले त्यात एकही नाव मुस्लिम नाही. हिंडनबर्ग प्रकरण भारतात झाले असते तर त्यावर यूएपीए लागला असता, असेही ओवेसी म्हणाले.