रुग्णसंख्येत झपाट्याने भर
नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. पण दहा दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरही वाढत आहे. शुक्रवारी (१० जून) दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.२६ टक्क्यांवर पोहचला. ३१ मार्च रोजी ०.६४ टक्के होता. शुक्रवारी भारतात ७,५८४ नवीन कोरोना रुग्ण आढळले होते, तर २४ रुग्णाचा मृत्यू झाला होता, तर ३,७९१ जणांनी कोरोनावर मात केली होती. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटी ३२ लाख ५ हजार १०६ झाली आहे.
देशात आतापर्यंत ४ कोटी २६ लाख ४४ हजार ९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर पाच लाख २४ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच ३१ मे रोजी देशात दैनंदिन २,३३८ नवे रुग्ण आढळले होते, तर सक्रिय रुग्णांची संख्या १७,८८३ इतकी होती, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ०.६४ टक्के इतकी होती.
आता दहा जून रोजी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या ७,५८४ इतकी झाली आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर २.२६ टक्के इतका झाला. देशात झपाट्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दहा दिवसांत तब्बल तीनपट रुग्णांची संख्या वाढली आहे.