26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीयमराठवाड्यातील पाच जणांना राष्ट्रपती पदक

मराठवाड्यातील पाच जणांना राष्ट्रपती पदक

एकमत ऑनलाईन

नांदेड/परभणी/लातूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, नांदेड येथील एसपी कार्यालयाचे पोलिस उपनिरीक्षक अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, एसीबी परभणीचे पोलिस निरीक्षक भारत केशवराव हुंबे, लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पोलिस निरीक्षक गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, औरंगाबाद सीपी कार्यालयाचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गजेंद्र मलाले आणि परभणी एसपी कार्यालयातील पोलिस उपनिरीक्षक राजेश रावणराव जाधव यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. त्यांना प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

नांदेड पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे वाचक मिर्झा अनवर बेग यांना ३८ वर्षे उत्कृष्ट व उल्लेखनीय तसेच निष्कलंक सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले. मिर्झा अनवर बेग हे १९८३ मध्ये पोलीस खात्यात शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांनी वजिराबाद, उमरी पोलीस ठाण्यात सेवा देऊन त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागात औरंगाबाद परिक्षेत्रामध्ये अधिक काळ सेवा दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडमध्येही त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. यापूवीर्ही त्यांना ऑगस्ट २०१५ मध्ये गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळालेले आहे. त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही मिळालेले आहे.

तसेच लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना उत्कृष्ट कार्यसेवेसाठी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. त्यांना तब्बल २८ वर्षे उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक हा पोलिस विभागातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाला आहे. भातलवंडे यांनी सन १९९३ साली पोलिस विभागात पोलिस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी भंडारा, गोंदीया, नांदेड, बीड, परभणी, लातूर, पोलिस प्रशिक्षण विद्यालय बाभळगांव लातूर येथे सेवा बजावली आहे.

महाष्ट्रातील ५१ जणांना पदक
यासोबतच महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना पोलिस पदक प्राप्त झाले आहेत. यातील चार पोलिस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’,७ ‘पोलिस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता ४० ‘पोलिस पदक’ जाहीर झाली आहेत.

नांदेडचे सुपुत्र लाटकर
यांना राष्ट्रपती पदक
भारतीय पोलिस सेवा १९९५ बॅचचे झारखंडमधील अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि नांदेडचे सुपुत्र संजय आनंदराव लाटकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले. हा प्रतिष्ठित बहुमान देशाच्या पोलिस दलातील निवडक अधिका-यांना दिला जातो. लाटकर महाराष्ट्रासह विविध राज्यांत गेल्या २६ वर्षांपासून सेवा बजावत आहेत. आतापर्यंत त्यांना ८ विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आले आहे. लाटकर यांनी लातूर, परभणीचे पोलिस अधीक्षक म्हणूनही सेवा बजावली आहे.
देशात ९३९ पोलिस
कर्मचा-यांचा गौरव
प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील ९३९ पोलिस कर्मचा-यांना त्यांच्या धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामधील १८९ गौरवमूर्तींना पोलिस पदक जाहीर करण्यात आले, तर ८८ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि ६६२ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक देण्यात येणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेत अतुलनीय शौर्य दाखवणा-या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने गौरविले जाते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या