प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमुळेच सीमा भागातील गावे अविकसित राहिली, अशी टीका करत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या महामोर्चावर निशाणा साधला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अपयशाचे हे शिंतोडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्वत:वर उडवून घेऊ नये. महापुरुषांच्या अवमानाला विरोध म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच महामोर्चा निघायला हवा होता, असे मतही प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले.
राजकीय आघाडी व आंदोलन वेगवेगळे ठेवल्यास शिवसेनेवर सीमा भागाच्या अविकासाचे शिंतोडे उडणार नाही, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. आजच्या मविआ मोर्चावर बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करायला नको होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. महामोर्चाचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सीमावाद. महाराष्ट्राच्या सीमेवरील गावे आज कर्नाटकात, गुजरातमध्ये, तेलंगणात, कर्नाटकात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांचा विकासच होत नसेल तर ते काय बोलणार, मात्र, याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेने अंग बाहेर काढून घ्यावे
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप सत्तेवर नंतर आले आहेत. त्यापूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यावर अधिक काळ सत्तेत होती. त्यामुळे विकास न झाल्याने ही गावे आज आक्रोश करत असतील तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच संपूर्ण दोषी आहेत. शिवसेनेने लवकरात लवकर यातून आपले अंग काढून घेतले नाही तर त्यांच्यावरही याचे शिंतोडे उडल्याशिवाय राहणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.