मुंबई : विराट कोहली हा यावर्षीच्या आयपीएलमध्ये सातत्याने अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीचा फटका आता कोहलीला बसणार आहे. कारण आयपीएलनंतर होणा-या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी तो आता संघाबाहेर असेल, असे समजत आहे.
या आयपीएलमध्ये विराट कोहली १२ सामन्यांमध्ये तीनवेळा शून्यावर बाद झाला. त्याचबरोबर त्याला सहा सामन्यांमध्ये दोन अंकी धावसंख्याही उभारताआली नाही. या गोष्टीचा फटका आता विराटला बसणार आहे. कारण विराटला आता संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय भारताची निवड समिती करत आहे. विराट कोहली वाईट फॉर्ममधून जात आहे आणि त्याला ब्रेक द्यायला हवा, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते.
निवड समितीने आता या वक्तव्याचा विचार केल्याचे दिसत आहे. कारण आयपीएलनंतर होणा-या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते, असे समजते आहे. त्याचबरोबर जवळपास तीन वर्षांमध्ये कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीचा फॉर्म हा वाईट सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.