24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाधोनी पुन्हा बनला फिनिशर

धोनी पुन्हा बनला फिनिशर

एकमत ऑनलाईन

मुंबईविरुद्ध चेन्नईने मारली बाजी
मुंबई : आयपीएलच्या ३३ व्या सामन्यात चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नेहमीप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावली. त्याने शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना चौकार आणि षटकार लगावत विजय खेचून आणला आणि तीन गडी राखून मुंबईविरुद्ध शानदार विजय मिळविला. आजच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑपपर्यंत पोहोचू शकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले.

मुंबईने दिलेल्या १५६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरताच चेन्नई संघाला पहिल्याच चेंडूवर मोठा फटका बसला. सलामीला आलेला ऋतुराज गायकवाड शून्यावर झेलबाद झाला. त्यानंतर चेन्नईचे खेळाडू ठराविक अंतरावर बाद होत गेले. सलामीला आलेल्या उथप्पाने ३० धावा केल्या, तर मिचेल सँनटरने ११ धावा करून संघाला लक्ष्यापर्यंत जाण्यास मदत केली. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना शेवटपर्यंत रोखून धरले.

मधल्या फळीतील अंबाती रायडूने चांगली खेळी करत चेन्नईसाठी ४० धावा केल्या, तर शिवम दुबे (१३), रविंद्र जाडेजा (३) स्वस्तात बाद झाले. शेवटी महेंद्रसिंग धोनी आणि ड्वेन प्रिटोरिअस या जोडीने चेन्नईला विजयापर्यंत नेले. धोनीने शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना षटकार आणि दोन चौकार लगावत विजय खेचून आणला, तर प्रिटोरिअसने २२ धावा करत चेन्नईच्या पडत्या काळात धोनीला साथ दिली. शेवटी महेंद्रसिंग धोनीने फिनिशरची भूमिका पार पडत चेन्नईला विजय मिळवून दिला.

याआधी नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई संघ सुरुवातीला फलंदाजीसाठी आला. मात्र मुंबईची सुरुवात अतिशय खराब झाली. मुंबईचे दोन्ही सलामीवीर पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाले. रोहित शर्मा मुकेश चौधरीने टाकलेल्या चेंडूचा सामना करताना झेलबाद झाला, तर तिलक वर्मा त्रिफळाचित झाला. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर मुंबई संघावरील दवाब वाढला. त्यानंतर संघ २३ धावांवर असताना दुस-या विकेटसाठी आलेला देवाल्ड ब्रेविसदेखील मुकेश चौधरीच्याच चेंडूवर चार धावांवर झेलबाद झाला.

त्यानंतर मधल्या फळीतील खेळाडूंनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादवेने ३२ धावा केल्या, तर चौथ्या विकेटसाठी आलेल्या तिलक वर्माने ५१ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ४३ चेंडूमध्ये ५१ धावा केल्या. तसेच हृतिक शोकीन (२५) आणि किरॉन पोलार्ड (१४) यांनीदेखील संघाला १५५ धावांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली. जयदेव उनाडकट याने नाबाद १९ धावांची खेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या