नागपूर : अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पत्नी आणि १८ महिन्यांच्या मुलीला वा-यावर सोडून दुस-या स्त्रीसोबत घरठाव केला. महिलेने तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता खासदार नवनीत राणा यांनी तिच्यासोबत आक्षेपार्ह भाषेत संभाषण केले. यासंदर्भात महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. यानंतर नवनीत राणा यांना नोटीस बजावून खुलासा मागितल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील महिलेची तक्रार राज्य महिला आयोगाला १७ जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. तक्रारीची दखल घेत राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिस ठाण्याला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पतीने आपल्याला अंधारात ठेवून दुसरा विवाह केला आणि १८ महिन्यांच्या मुलीला वा-यावर सोडले, असा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हा पदाधिकारी नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचा प्रदेशाध्यक्ष आहे. राणा यांनी महिलेची तक्रार ऐकून न घेता आरोपीला पाठीशी घालण्याचे काम केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.