मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात धार्मिक कारणांवरून तणावाच्या घटना घडत आहे. वाढती बेरोजगारी, महागाई, शेतक-यांचे प्रश्न यांसारख्या मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून जाणुनबूजुन अशा घटनांद्वारे समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. कोरोनामुळे देशात ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाला, हा जागतिक आरोग्य संघटनेचाच अहवाल आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळेच हे मृत्यू झाले. हे अपयश लपवण्यासाठीच धार्मिक वातावरण पेटवले जात आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
जनता आता महागाई, बेरोजगारीसारख्या मुद्यांमुळे होरपळून निघत आहे. त्यामुळे भाजपच्या धार्मिक राजकारणाला जनता आता फसणार नाही. देशभरात आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे अशा राजकारणाविषयी लोक आता अलर्ट आहे. मुळ मुद्यावरून लक्ष हटवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना लोक फसणार नाहीत, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
धार्मिक तेढ निर्माण करणा-या सभांवर बंदी घालावी
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणा-या सभांवर बंदी घालावी, अशी मागणीदेखील नाना पटोले यांनी राज्य शासनाकडे केली. दिल्लीत नुकत्याच झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, भाजपनेच दिल्लीत दंगल चिघळवली. महाराष्ट्रातही भाजपचा हाच प्रयत्न सुरू आहे. पण राज्य सरकारने त्यांना यात यश मिळू दिले नाही. मात्र, असा प्रयत्न करणा-यांवर राज्य सरकारने गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील नाना पटोले यांनी केली.
भोंग्यांचा मुद्दा चर्चेतून सोडवला पाहिजे!
मशिदींवरील भोंग्यांबाबतही नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मशिदींवरील भोंगे काढायचे असतील तर त्यासाठी मुस्लीम धर्मगुरूंना चर्चेला बोलवायला हवे. चर्चेतून हा प्रश्न सोडवायला पाहिजे, असे आपले मत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. मात्र, समोपचाराचा मार्ग न अवलंबता धर्माचा ठेका घेतल्याप्रमाणे जे लोक आता वागत आहेत. त्यामुळे राज्याची बदनामी होत आहे. अशा लोकांना राज्य सरकारने वेळीच रोखायला हवे, असे पटोले म्हणाले.
राज ठाकरे सुपारीबाज, हे फडणवीसांचेच वक्तव्य!
राज ठाकरे हे सुपारीबाज नेते आहेत, असे वक्तव्य पुर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच केले होते. त्यामुळे राज ठाकरे आता कुणाची सुपारी घेऊन बोलत आहेत, हे त्यांनीच स्पष्ट करावे, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला. तसेच, मीदेखील रोज हनुमान चालिसा म्हणूनच घरातून बाहेर पडतो. पण त्याचा बाऊ कधी करत नाही. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंर्त्य आहे. आम्ही सर्वधर्मसमभाव विचारांना मानतो. आम्हाला धर्म कोणावर टीका करायला शिकवत नाही. त्यामुळे आम्हाला कुणी धर्माबाबत शिकवायची गरज नाही, असेही पटोले यांनी सुनावले.