नाशिक : नाशिकहून कोल्हापुरकडे चाललेल्या खासगी लक्झरी बसने शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पेट घेतला. चिंचोली जवळील मोहदरी घाटात ही घटना घडली. चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली. प्रवाशी तत्परतेने खाली उतरल्याने जीवीत हानी टळली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीहरी कुलकर्णी, रा. म्हसरुळ, नाशिक हे खासगी लक्झरी बस (क्र. एमएच ०९, पी.बी. ३०६९) नाशिकहून कोल्हापुरकडे ३० ते ३५ भाविकांना घेऊन जात होते. नाशिकहून निघालेली बस रात्री पावणे दहाच्या सुमारास मोहदरी घाटात पोहोचली. बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवाशी बसमधून सुखरुप बाहेर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना व अग्निशमन दलास माहिती दिली.
सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असून रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.