नवी दिल्ली : कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी यासंबंधीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. तसेच नियमांचे पालन करणे म्हणजे राष्ट्रधर्म आहे, जोपर्यंत ही स्थिती निवळत नाही, तोपर्यंत या राष्ट्रधर्माचे सर्वांनी पालन करावे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून राष्ट्रपतींनी भाषण केले. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये त्यांनी देशाचा आजवरचा प्रवास उलगडून दाखवला. मानव समुदयाला एकमेकांच्या सहकार्याची गरज यापूर्वी कधीही पडली नव्हती, जितकी आज आहे. दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पण मानवाचा कोरोना विषाणूशी संघर्ष अद्याप सुरूच आहे. या महामारीने हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर आघात झाला आहे. जागतिक समुदायाला या अभूतपूर्व आपत्तीचा सामना करावा लागला आहे. नवनवी रुपे धारण करत हा विषाणू नवीन संकट निर्माण करत आहे.
आपल्या देशात लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. तसेच विकसनशील अर्थव्यवस्था असल्याने आपल्याजवळ या अदृश्य शत्रूसोबत लढण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच पुरेसे संसाधने उपलब्ध नव्हते. परंतु अशा कठीण वेळेसच कोणत्याही राष्ट्राची संघर्ष करण्याची क्षमता उजळून निघते. आपण कोरोना विषाणूविरोधात दृढ संकल्प दाखवून दिला आहे. आपण आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आणि अधिक सक्षम केल्या. तसेच दुस-या देशांच्या मदतीसाठीदेखील पुढे आलो. दुस-या वर्षी आपण स्वदेशी लसीदेखील विकसित केल्या. तसेच जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू केले. हे अभियान वेगाने पुढे जात आहे. भारताच्या या योगदानाचे जागतिक स्तरावरही कौतुक करण्यात आले आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
महामारीचा प्रभाव कायम, सर्वांनी सतर्क राहावे
महामारीचा प्रभाव अद्यापही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे तसेच आपल्या सुरक्षेत कोणतीही ढील देता कामा नये. आपण आजवर सावधानता बाळगली आहे ती अशीच पुढे सुरू ठेवायची आहे. यासाठी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे हे कोविड अनुरुप व्यवहारांचा भाग राहिला आहे. जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपल्याला हा राष्ट्रधर्म पाळायचाच आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.