26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeक्रीडान्यूझीलंडला क्लिनस्वीप, ७३ धावांनी भारताचा दणदणीत विजय, ३-० ने मालिका खिशात

न्यूझीलंडला क्लिनस्वीप, ७३ धावांनी भारताचा दणदणीत विजय, ३-० ने मालिका खिशात

एकमत ऑनलाईन

कोलकाता : रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने तिस-या सामन्यात न्यूझीलंडवर ७३ धावांनी दणदणीत विजय मिळवत ३-० ने मालिका खिशात घातली. ९ धावांत ३ बळी घेणारा अक्षर पटेल सामनावीरचा, तर या मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणारा रोहित शर्मा मालिकावीरचा मानकरी ठरला.
आज झालेल्या तिस-या सामन्यात रोहितच्या ५६ धावांच्या झटपट खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडपुढे १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करणा-या न्यूझीलंडला सुरुवातीलाच अक्षर पटेलने ३ धक्के दिले आणि त्यांचे कंबरडे मोडले.

त्यानंतर न्यूझीलंडचा संघ सावरू शकला नाही. त्यामुळे त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करीत रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, भारताच्या मधल्या फळीची घसरगुंडी झाल्याचे पाहायला मिळाले, तरीही रोहित शर्मा आणि इशान किशनने चांगली पायाभरणी केल्याने मोठी धावसंख्या उभारता आली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर भेदक मारा करीत भारताच्या अक्षर पटेलने त्यांचे कंबरडेच मोडले.

तिस-या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने सलामीवीर डॅरिल मिचेलला बाद केले, तर अखेरच्या चेंडूवर मार्क चॅम्पमनला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर पाचव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने ग्लेन फिलीप्सला शून्यावर बाद केले. एका बाजूने या विकेट्स पडत असताना सलामीवीर मार्टिन गप्तील दमदार फलंदाजी करत होता. त्याने अर्धशतक झळकावले. त्यानंतर युजवेंद्र चहलने गप्तिलला ५१ धावांवर बाद केले. त्याच्यानंतर न्यूझीलंडचा एकही फलंदाज जास्त काळ टिकाव धरू शकला नाही. त्यामुळे भारताने मोठा विजय साकारत ३-० ने मालिका जिंकली.

तिस-या ट्वेन्टी-२० सामन्यातही नाणेफेकीचा कौल रोहित शर्माच्या बाजूने लागल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन सामन्यांत रोहितने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी स्विकारली होती, पण आजच्या सामन्यात रोहितने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहित आणि या सामन्यात संघात स्थान मिळवलेल्या इशान किशनने भारताला झोकात सुरुवात करून दिली. रोहित आणि इशान यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. सहा षटकांच्या पॉवरप्लेमध्ये रोहित आणि इशान यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला १० च्या धावगतीने धावा जमवून दिल्या होत्या. पण सातव्या षटकात भारताला इशानच्या रुपात पहिला धक्का बसला. न्यूझीलंडसाठी आजच्या सामन्यात कर्णधार असलेल्या मिचेल सँटनरने इशानला बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. इशानने यावेळी २१ चेंडूंत सहा चौकारांच्या जोरावर २९ धावांची खेळी साकारली. इशान बाद झाल्यावर सूर्यकुमार यादव (०) आणि रिषभ पंत (४) हे लवकर बाद झाले आणि भारताचा डाव अडचणीत आल्यासारखे वाटत होते.

पण रोहितने भारताच्या धावसंख्येला चांगला आकार अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. इशा सोधीने त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. त्याने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. त्यानंतर आलेल्या वेंकटेश अय्यरला फक्त २० धावांवरच समाधान मानावे लागले. त्याचबरोबर विश्वासू श्रेयस अय्यरलाही २५ धावाच करता आल्या. अखेरच्या क्षणी दीपक चहरने फटकेबाजी करीत धावगती वाढविली.

रोहितचा विश्वविक्रम
रोहितने आंतराराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत १५० षटकारांचा पल्ला गाठला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त, एकदिवसीयमध्ये १०० पेक्षा जास्त आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १५० पेक्षा जास्त षटकार लगावण्याचा विश्वविक्रम रचला आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या