23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

एकमत ऑनलाईन

उजवीकडे गेले तर जमेल की डावीकडे?
परळी : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त परळी येथे आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली आयोजित केली होती. राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्या सध्या नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आज त्यांनी मी उजवीकडे गेले तर जमेल का, डावीकडे गेल्यास जमेल, असा प्रश्न उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, उपस्थित लोकांनी तुम्ही आहे तिथेच थांबा असा सल्ला दिला.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचाही एकदा पराभव झाला होता. मात्र, माझ्या पराभवाची चर्चा जास्त झाली. पराभव जरी झाला असला तरी मला मतदान करणा-या लोकांना मी वा-यावर सोडू शकत नाही. कधी कधी वाटते सगळे सोडून द्यावे. मात्र, तुमचे चेहरे माझ्या डोळ््यासमोर येतात आणि माझे संपूर्ण आयुष्य मी आता तुमच्या चरणी अर्पण केलेले आहे, असे मत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत पंकजा मुंडे यांनी परळी शहरात भव्य रॅली काढली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. त्यामुळे त्या कोणता निर्णय घेणार का, असेदेखील बोलले जात आहे. या चर्चांवरून पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना एक प्रश्न विचारला. मी उजवीकडे गेले तर जमेल का? की डावीकडे गेल्यास जमेल? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि जनतेला विचारला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी पंकजा मुंडे यांना कुठेही न जाण्याचा सल्ला दिला. याबरोबरच आम्ही आपल्या सोबत आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांना यावेळी कार्यकर्त्यांना धीर दिला. पंकजा मुंडे यांनी यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. माझा संघर्ष कायम आहे, सध्या फोटोचे राजकारण सुरू असल्याचे सांगत धनंजय मुंडे यांना टोला लगावला.

मी नाही, कार्यकर्ते नाराज
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर तब्बल ४० दिवसांनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यादरम्यान मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भाजपमध्ये नाराजीनाट्याला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल विचारले असता मी नाराज नाही. पण कार्यकर्ते नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.

परळीत झालेली एक
चूक महागात पडली
पंकजा मुंडे म्हणाल्या की, परळीत माझ्याकडून जी चूक झाली, ती आपल्याला खूप महागात पडली आहे. माझ्यावर आरोप करताना शत्रूंनी पातळी सोडली. मात्र, मी कधी पातळी सोडली नाही. मी सदैव तुमच्यासोबत आहे. तुमचे काम करत राहीन. लोकांच्या घरापर्यंत जाऊन काम करणा-या कार्यकर्त्यालाच यापुढे तिकीट देणार. पंकजाताई परळीत कुठे दिसत नाहीत, असे म्हणणा-यांनी अतिवृष्टीच्या काळात मी जी मदत केली आणि कोरोनाच्या काळात जे काम केले, ते एकदा पाहावे. त्यामुळे आता आपल्याला लोकांमध्ये उतरून काम करावे लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या