नवी दिल्ली : पुढील दहा वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातमधील भूज येथे त्यांनी के. के. पटेल सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयाचे उद्घाटन शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी केले. यावेळी ते बोलत होते.
आपल्या भाषणात मोदी म्हणाले, भूजमधील हे रुग्णालय रुग्णांना कमी दरात चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल. दोन दशकांपूर्वी गुजरातमध्ये १ हजार १०० जागांसह केवळ ९ वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध होती. आज आपल्याकडे ६ हजार जागांसह ३६ महाविद्यालये आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात परवडण्याजोगी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचे ध्येय ठेवल्यास १० वर्षांत देशाला विक्रमी संख्येने नवे डॉक्टर्स मिळतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
२०० खाटांचे चॅरिटेबल रुग्णालय
हे रुग्णालय भूजच्या कच्छी लेवा पटेल समाजातर्फे उभारण्यात आले आहे. २०० खाटांचे हे रुग्णालय कच्छमधील पहिले चॅरिटेबल सुपर स्पेशॅलिटी रुग्णालय आहे. येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी, कार्डिओथोरॅसिस सर्जरी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, न्युक्लिअर मेडिसीन, न्युरो सर्जरी, सांधे प्रत्यारोपण, इत्यादी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.