29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeराष्ट्रीयपक्ष, चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात

पक्ष, चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात

एकमत ऑनलाईन

आयोगाच्या कामकाजावर स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली लढाई निवडणूक आयोगात होणार आहे.

आमचीच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, निवडणूक आयोगाला यासंबंधी निर्णय घेण्यापासून रोखले जावे, अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची ही याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या ५ सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. आजपासून घटनापीठासमोर सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला.

यासंदर्भात निवडणूक आयोग शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, याची सगळ््यात आधी पडताळणी करेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार आणि खासदार सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुसंख्येने आहेत, पण पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगासमोर सिद्ध करावे लागणार आहे. यासाठी दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्रही देण्यात येत आहेत. या सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक आयोग शिवसेनेचे आमदार-खासदार तसेच पदाधिका-यांना सुनावणीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याची शक्यता आहे.

यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसेच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्याने निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलेही जाऊ शकते. हे चिन्ह गोठवण्यात आले तर ठाकरे गट आणि शिंदे गट यांना वेगळ््या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागू शकतात.

निवडणूक आयोगाच्या
कार्यवाहीला स्थगिती नाही
निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला कोणतीही स्थगिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग पुढील कार्यवाही सुरू करू शकणार आहे. शिवाय शिवसेनेचे चिन्ह आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय आता निवडणूक आयोग घेऊ शकणार आहे.

बहुमत आमच्याकडे शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले असून, लोकशाहीत बहुमताला महत्व असते, बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आमच्याकडे आहे. देशात जे काही निर्णय होतात ते कायदे, राज्यघटना यांच्याप्रमाणे होत असतात, असे म्हटले.

संविधानासाठी लढा महत्त्वाचा ठरेल
कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या