ऑफलाईन परीक्षेसाठी प्रतितास १५ मिनिटे सूट : सामंत
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रतितास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत यांना या संदर्भात युवा सेनेने पाठवलेल्या मागणीपत्रात मागील २ वर्षांत कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व विद्यापीठांनी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे. दोन वर्षे (एमसीक्यू) बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर लिहिण्यासाठी आवश्यक असलेला लिखाणाचा सराव राहिलेला नाही. म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आपणास विनंती करतो की, व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे, त्यापेक्षा अर्धा, एक तास वेळ वाढवून देण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत पूर्ण पेपर लिहिता येईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे म्हटले होते.
या पत्रावर युवासेना सचिव वरूण सरदेसाई आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांची स्वाक्षरी होती.
या अगोदर यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला होता. कोरोनाच्या काळात लेखनाचा सराव कमी झाला होता, याचा विचार करून ही सूट देण्यात आली होती. आता विद्यापीठाच्या परीक्षेतही ऑफलाईन परीक्षेसाठी ही सूट देण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
कुलगुरुंच्या बैठकीत निर्णय
या मागणीचा कुलगुरुंच्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. त्यानंतर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रतितास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. यामुळे सर्वच विद्यापीठातील परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.