नादिया : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शने होत आहेत. अशातच बंगालमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या आंदोलनानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा आंदोलकांनी नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक करून लोकल ट्रेनचे नुकसान केले. त्यामुळे राज्यात पुन्हा हिंसाचार भडकल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर दगडफेक केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण रेल्वे स्थानकात घुसले. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार जमावाने प्लॅटफॉर्मवर धावणा-या ट्रेनवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे लालगोला मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे.