मुंबई : मंदिर, गड-किल्ले आणि संरक्षित स्मारके यांच्या जतन आणि संवर्धनाचे काम करताना त्यांचे मूळ रुप, स्थान महात्म्य आणि इतिहास लक्षात घेऊन केले जावे, असे करताना हे काम शास्त्रोक्त पद्धतीने व कालबद्धरित्या करण्यात येईल, याचीही काळजी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री संकल्पकक्ष’च्या माध्यमातून विविध विभागांच्या २५ योजनांचा आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात ८ मंदिरांचा जीर्णोद्धार तर ६ गडकिल्ल्यांचे संवर्धन होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध विषयांचा आज आढावा घेतला. यामध्ये प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, नवीन लेण्यांच्या अनुषंगाने खोदकाम, महावारसा सोसायटीची स्थापना करणे, गड-किल्ल्यांचे संवर्धन इ. विषयांचा समावेश होता. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर तसेच महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शासनाने प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेतला असून या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ मंदिरांच्या जीर्णोद्धाराबरोबर परिसर विकासाचे काम करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील धुतपापेश्वर, कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर, पुणे जिल्ह्यातील एकवीरा देवी, नाशिक जिल्ह्यातील गोंदेश्वर, औरंगाबाद जिल्ह्यातील खंडोबा, बीड जिल्ह्यातील भगवान पुरुषोत्तम, अमरावती जिल्ह्यातील आनंदेश्वर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिवमंदिराचा समावेश आहे.