मुंबई : विक्रांत प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या अधिक आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत २९ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप केला. या कंपनीत उद्धव ठाकरे यांचेही हितसंबंध गुंतलेले असल्याचा आरोप करताना हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवून ठेवले आहे ते जाहीर करा, असे आव्हान त्यांनी दिले.
गेले काही दिवस किरीट सोमय्या व शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुरा सुरू होता. आज सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आपला मोर्चा वळवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित श्रीजी होम्स या कंपनीत मनी लाँड्रिंगद्वारे बेहिशेबी २९ कोटी रुपये गुंतवण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. श्रीधर पाटणकर हे श्री जी होम्स या कंपनीत भागीदार आहेत. या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी काळा पैसा वापरण्यात आला. या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री जी होम्स या कंपनीशी आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
हवालाच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवहार
हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. कोमो स्टॉक्स या कंपनीच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
चतुर्वेदीचा पत्ता सांगा
केंद्रीय तपास यंत्रणा अनेक दिवसांपासून नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत. मात्र, तो सापडत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदकिशोर चतुर्वेदीचा पत्ता सांगावा अन्यथा ईडी आणि कंपनी मंत्रालयाने नंदकिशोर चतुर्वेदी याला फरार म्हणून घोषित करावे. या नंदकिशोर चतुर्वेदी याने आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर यांना आपल्या १२ बनावट कंपन्यांचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर करून दिला, असा आरोप सोमय्यांनी केला.