18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeमहाराष्ट्रपार्लेनंतर साबण, डिटर्जंट पावडर महागले

पार्लेनंतर साबण, डिटर्जंट पावडर महागले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने अगोदरच सामान्य माणूस महागाईच्या आगीत होरपळत असताना महागाईचा भस्मासूर सामान्यांची पाठ सोडायला तयार नाही. आता दैनंदिन लागणा-या वस्तूही महागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी काडीपेटीचे दर वाढविण्यात आले. त्यानंतर पार्ले जीचे दरही वाढले. आता साबण आणि डिटर्जंट पावडरचे दर ३ ते २१ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत असून, महागाईत सामान्य माणूस होरपळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडल्यानंतर जवळपास सर्वच वस्तूंचे आणि सेवांचे दर वाढायला सुरुवात झाली. मुळातच पेट्रोल, डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे कधीच गेले नव्हते आणि गॅस सिलिंडरचा दरही हजार रुपयांच्या जवळ कधीच गेला नव्हता. परंतु सध्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुळातच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यास त्याचा सर्व वस्तूंच्या खरेदीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम होतो. याची प्रचिती मागच्या ब-याच दिवसांपासून आली आहे. कारण वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

अलिकडे अनेक वर्षांनंतर प्रथमच काडीपेटीचे दर दुप्पट दराने वाढविण्यात आले. तसेच पार्ले जी बिस्किटही स्वस्त होते, त्याचेही दर वाढविण्यात आले. आता हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांनी साबण आणि डिटर्जंटच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे व्हील डिटर्जंट पावडर, रिन बार आणि लक्सच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच अन्य वस्तूंच्या किमतीतदेखील वाढ झाल्याने वाढती महागाई नजीकच्या काळात सर्वसामान्यांना धुवून काढणार आहे.

किंमत वाढविण्यामागे दिलेल्या स्पष्टीकरणात कंपन्यांनी म्हटले आहे की, त्यांनी निवडक गोष्टींच्या किमतीत बदल केला आहे. ग्राहकांवर किंमत वाढीचा पूर्ण दबाव पडणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. दुस-या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हर वार्षिक आधारावर ९ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा २१८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, तो अंदाजापेक्षा कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

व्हील पावडर, रिन बार महाग
व्हील डिटर्जंट पावडर, रिन बार आणि लक्स साबण यांच्या किमतीत ३.४ ते २१.७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्याचवेळी आयटीसीने फियामा साबणाच्या किमतीत १० टक्के, विवेलमध्ये ९ टक्के आणि ऐंगेज डियोड्रंटमध्ये ७.६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

साबणाच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ
रिन बारच्या २५० ग्रॅम पॅकची किंमत ५.८ टक्के वाढली आहे. एफएमसीजीच्या मोठ्या कंपनीने लक्स साबण १०० ग्रॅम मल्टीपॅक २१.७ टक्क्यांनी वाढविले. त्यामुळे या साबणाच्या किमतीत २५ रुपये वाढ झाली आहे. त्याचवेळी आयटीसीने फियामा साबण १०० ग्रॅमच्या पॅकच्या किमतीत १० टक्के वाढ केली.

डियोड्रंटच्या किमतीत वाढ
या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनीने १५० मिली ऐंगेज डियोड्रंटच्या किमतीत ७.६ टक्के आणि १२० मिलीच्या ऐंगेज परफ्युममध्ये ७.१ टक्क्यांची वाढ केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या