मानवत : तालुक्यातील गरजू शेतक-यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी मानवत तालुका संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सद्यस्थितीत पेरणी योग्य पाऊस झाला असून शेतक-यांना पेरणीसाठी पैशाची अंत्यत आवश्यकता आहे. परंतू मानवत शाखेतील मध्यवर्ती बँकेचा वतीने गरजू शेतक-यांना कर्जाचे वाटप करण्यात येताना दिसून येत नाही. तसेच कर्जाचे वाटप करताना अधिकारी, संचालक यांच्या शिफारसी शिवाय सर्व साधारण शेतक-याला कर्जाचे वाटप होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक परीस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
गरजू शेतक-यांना पिक कर्जाचे तात्काळ वाटप करण्यात यावे अन्यथा तालुक्यातील इरळद, मानोली, नागर जवळा, सावळी, करंजी, आंबेगाव, मानवत आदी गावातील शेतक-यांच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँक मानवत येथे पिक कजार्साठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर मानवत तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉ.लिंबाजी कचरे, उपाध्यक्ष दत्तरावजी शिंदे, सचिव परमेश्वरराव मांडे, बालासाहेब आळणे, अशोकराव बहिरट, गोविंद घांडगे, कॉ.विष्णू जाधव यांच्यासह मानवत तालुका संघर्ष समिती पदाधिकारी व शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.