पुणे: वृत्तसंस्था : स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली कर्मचा-यांना नारळ दिला जात असल्यावरून पुण्याच्या कामगार आयुक्तांनी जगातली सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमॅझॉनला नोटीस पाठवत १७ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले.
अॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपनीला अशी नोटीस मिळाल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्पलॉइज सीनेट यांच्यावतीने कंपनी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तीत इंडस्ट्रियल डिस्पुट अॅक्टनुसार कुठल्याही कंपनीला सरकराच्या परवानगीशिवाय कर्मचारी कपात करता येत नाही, असं सांगण्यात आले.
एनआयटीईएसच्या नुसार जे कामगार एक वर्षापेक्षा जास्त काळ कंपनीत काम करतात त्यांना तीन महिने अगोदर नोटीस दिल्याशिवाय आणि सरकारच्या परवानगीशिवाय नोकरीवरुन कमी करता येणार नाही. ही तक्रारदार संस्था आयटी सेक्टरमधल्या कर्मचा-यांच्या हक्कासाठी काम करते.
भारतात अॅमॅझॉनचे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीच्या या निर्णयामुळे हजारावर कर्मचा-यांना रातोरात नोकरी गमावल्याने घरी बसावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना कामगार कायद्याखाली कंपनीला जाब विचारत आहेत.