22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeमहाराष्ट्रपेपरफुटी प्रकरणात लातूरचा आरोग्य अधिकारी जाळ््यात

पेपरफुटी प्रकरणात लातूरचा आरोग्य अधिकारी जाळ््यात

एकमत ऑनलाईन

पुणे : आरोग्य विभागातील भरती परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून, लातूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला आज अटक केली. खुद्द बडगिरेनीच पेपर फोडल्याचे आणि या पेपरसाठी आरोग्य विभागातील डॉ. संदीप त्र्यंबकराव जोगदंड यांच्याकडून १० लाख आणि शिपाई शाम महादू म्हस्के यांच्याकडून ५ लाख रुपये घेतल्याचे तपासात उघड झाले.

या प्रकरणातील आरोपी प्रशांत व्यंकटराव बडगिरे याने पेपर कसा फोडला आणि तो कोठून मिळविला, याचा आता तपास सुरू करण्यात आला. यापूर्वी आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबई डॉकयार्डमधील एक खलाशी आणि निवृत्त जवानाला अटक केली. त्यामुळे या पेपर फुटीमध्ये अटक झालेल्यांची संख्या वाढली आहे. या पेपरफुटीचे धागेदोरे आता आरोग्य विभागापर्यंत पोहोचले आहेत.

आरोग्य विभागात मोठा गाजावाजा करत परीक्षा घेण्यात आली होती. पण या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. आता तर आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिका-यानेच पेपर फोडल्याचे समोर आले आहे. लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी हा पेपर फोडल्याचे समोर आले. यामुळे अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जालन्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक एक माहिती समोर येत गेली.

अखेर आज पोलिसांनी एका अधिका-याला अटक केली. या अधिका-यानेच हा पेपर फोडल्याचे समोर आले आहे. बडगिरे याने त्याच्याच विभागातील संदीप जोगदंड यांच्याकडून १० लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून ५ लाख रुपये घेऊन पेपर फोडला होता. चार दिवसांपूर्वीच जालन्यातून पुणे येथील सायबर सेलच्या पथकाने २९ वर्षीय तरुण विजय प्रल्हाद मुराडे याला अटक केली. हा तरुण जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील नांदी येथील रहिवासी आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेमार्फत तपास
पुणे पोलिसांची सायबर शाखा या प्रकरणाचा तपास करत असून प्रशांत बडगिरेसह ११ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बडगिरे हा लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागात मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे, असे असतानाही १० लाखांच्या लाचेसाठी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्यामुळे कुंपणाने शेत खाल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे.

६ ते ७ लाखांचा रेट
पेपर देण्याच्या बदल्यात एका उमेदवाराकडून ६ ते ७ लाख रुपये घेण्याचे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये आरोपींना मिळणार होते. उमेदवांनी अद्याप पैसे दिले नव्हते. मात्र, यादीत नाव आल्यानंतर त्यांना पैसे द्यावे लागणार होते. त्यासाठी आरोपींनी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ठेवून घेतली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून उमेदवारांची मूळ कागदपत्रेही जप्त केली आहेत.

१०० पैकी ९२ प्रश्न झाले होते व्हायरल
३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील पदाच्या निवडीसाठी लेखी परीक्षा पार पडली. पण पेपर सुरू होण्याआधी १०० प्रश्नांपैकी ९२ प्रश्न हाताने लिहून ते व्हायरल करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिस स्टेशनमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या