बंगळूरू : खात्याची अचूक माहिती न दिल्याच्या रागातून वडिलाने आपल्याच मुलाला जिवंत जाळले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शेजा-यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली. दीड कोटी रुपयांच्या हिशोब बरोबर न दिल्याने हा प्रकार घडला. ही घटना बेंगळुरूमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी वडील सुरेंद्र आणि २५ वर्षीय मुलगा अर्पितमध्ये दीड कोटी रुपयांच्या खात्याच्या सेटलमेंटवरून वाद झाला होता. शेजा-यांच्या म्हणण्यानुसार, घाबरलेला अर्पित स्वत:ला वाचवण्यासाठी घराबाहेर पडला. त्याच्या अंगावर थिनर शिंपडलेले होते. तो सतत वडिलांना माफ करण्याची विनंती करीत होता. परंतु, वडील काहीही ऐकायला तयार नव्हते. काही वेळातच वडिलांनी माचिसची काडी जाळल्यानंतर फेकून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळातच अर्पितच्या शरीराला आग लागली. शेजा-यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी अर्पितचा मृत्यू झाला. शेजा-यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली आहे.