26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeराष्ट्रीयप्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार

प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या संचलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी देण्यात आली. यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली होती. मात्र, केंद्राने अचानक निर्णय बदलत महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी मिळाल्याने देखाव्यातून आता राज्यातील जैवविविधतेचे दर्शन होणार आहे.

महाराष्ट्राच्या आगळ््यावेगळ््या देखाव्यातून राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढळणा-या विविध सजीव प्रजातींचा समावेश असेल. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का, हेदेखील पाहावे लागेल. २६ जानेवारीला राजपथावर होणा-या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते.

यंदाच्या चित्ररथात राज्यातील जैवविविधेवर आधारित आहे. राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राखीव ठेवले आहे. राज्यात अनेक दुर्मिळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले. ‘ब्ल्यू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट दर्शविणारे राज्यफूल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी फुलपाखरे यांच्या प्रतिमा आहेत. चित्ररथावर १५ फूट भव्य ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या कास पठाराची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा दर्शविण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. २०१५ मध्ये पंढरीची वारी या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता, तर २०१८ मध्ये शिवराज्याभिषेक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८० मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली बैलपोळा या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या