नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन प्रफुल्ल पटेल यांना हटवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफचा प्रशासकीय कार्यभार सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल आर देव, माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. एफ. कुरैशी आणि माजी भारतीय कर्णधार भास्कर गांगुलींच्या त्रिसदस्यीय समितीकडे सोपवला आहे. या प्रकरणी आज सुनावणी झाली. नव्या निवडणुका होईपर्यंत ही समिती देशातील फुटबॉल कार्यक्रमाचे संचालन करणार आहे.
एआयएफएफमध्ये बराच काळ निवडणुका झाल्या नाहीत. गेली १० वर्षे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल एआयएफएफचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, सूर्यकांत आणि पी. एस. नरसिंह यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही अंतरिम व्यवस्था असल्याचे स्पष्ट केले आहे. एआयएफएफची नवीन घटना तयार झाल्यानंतर त्याच्या निवडणुका होणार आहेत. न्यायालयाने सांगितले की, संविधानाचा मसुदा त्यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यास मान्यता देण्यात येईल.
नोव्हेंबरमध्ये फुटबॉल विश्वचषक
एआयएफएफसाठी उपस्थित असलेल्या वरिष्ठ वकिलांनी नोव्हेंबरमध्ये होणा-या फुटबॉल विश्वचषकाचा संदर्भ दिला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीकडे काम सोपविण्यापेक्षा लवकर निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. याला विरोध करताना दिल्ली उच्च न्यायालयात या खटल्याचे याचिकाकर्ते ज्येष्ठ वकील राहुल मेहरा म्हणाले, फुटबॉलच्या जागतिक क्रमवारीत आपण १०९ व्या क्रमांकावर आहोत. विश्वचषकाची चिंता करण्याऐवजी आपण आपले घर सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे म्हटले. जवळपास १० वर्षे प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीचा या फेडरेशनवर कब्जा होता.