बीड : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी आता स्वत: तपास यंत्रणांचा ओएसडी बनावे आणि किरीट सोमय्या यांना या यंत्रणांचा प्रवक्ता बनवावे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लगावला आहे. नवाब मलिक बीडमध्ये आहेत. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवरच हल्ला चढवला.
फडणवीस तपास यंत्रणांना माझ्याविरोधात सूचना देत आहेत. मी कुणालाही घाबरणार नाही. भाजप महाराष्ट्रातील ‘चोरों का बाजार’ आहे तर किरीट सोमय्या या बाजारातील बाराती आहेत, असा घणाघाती हल्ला मलिक यांनी चढवला.
पाहुण्यांची वाट पाहतोय
आपल्या घरावर ईडीची धाड पडणार असल्याचे मी ऐकले. मी पाहुणे येण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटं आणून ठेवली आहेत, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. कोणी कितीही स्वप्नं पाहिली तरी आमचं सरकार पाच वर्षे चालेल, असे सांगतानाच आम्हाला राजीनामा द्यायला सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर अमित शहांनीच राजीनामा दिला पाहिजे. लोकसभेची निवडणूक आधी झाली. त्यामुळे ‘पहले आप, बाद में हम’ असा पलटवारही त्यांनी केला.