मंगळुरू : कर्नाटकातील मंगळुरू येथील मत्स्य प्रक्रिया युनिटमध्ये गुदमरून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस आयुक्त एन शशी कुमार यांनी सोमवार दि. १८ एप्रिल रोजी दिली.
या अपघातात ठार झालेले पाच कामगार हे पश्चिम बंगालचे आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मंगळुरू विशेष आर्थिक क्षेत्रातील श्री उल्का एलएलपी या फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये घडली.
एक कामगार कचरा उचलण्याच्या टाकीच्या आत पडला आणि बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी इतर सात मजूर टाकीत घुसले आणि तेही बेशुद्ध पडले. त्यांना एजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. जिथे तिघांचा मृत्यू झाला. काल रात्री इतर दोन मजुरांचा आज सकाळी आयसीयूमध्ये मृत्यू झाला असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. ठार झालेले सर्व मजूर हे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. त्यांचे वय २० ते २२ वर्षांच्या दरम्यान आहे. आम्ही व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (हत्येसाठी दोषी नसून) गुन्हा दाखल केला आहे. प्रॉडक्शन मॅनेजर रुबी जोसेफ, फील्ड मॅनेजर कुबेर गाडे, पर्यवेक्षक मोहम्मद अन्वर आणि फारूक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.