समन्वय समिती नेमण्याची गरज : जदयू
पाटणा : बिहार सरकारचे कामकाज व्यवस्थितपणे चालण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याची गरज सत्ताधारी आघाडीतील संयुक्त जनता दलाने व्यक्त केली आहे. बिहारमध्ये भाजप व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आल्याला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा वेळी सरकारचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी समन्वय समितीची गरज असल्याचे मत मंत्री विजेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
विजेंद्र यादव हे नितीशकुमार यांचे निकटवर्तीय आहेत. ऊर्जा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत. दोन्हीही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी शोधत असतात, असे चित्र आहे.
अनेक मुद्यांबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांच्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपूर्वी फुलवारी शरीफमध्ये काही जणांना अटक करण्यात आली होती. हा संवेदनशील मुद्दा असल्याचे जेडीयूचे म्हणणे आहे, तर दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई योग्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. महसूल विभागातील विभाग अधिका-यांच्या बदल्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रोखल्या होत्या. या मुद्यावरूनही दोन्ही पक्षांत खटके उडाले होते.
महसूल विभागाचे मंत्रिपद भाजपकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी बदल्या रोखल्यानंतर महसूल मंत्री रामसूरत राय यांनी टीका केली होती. महसूल विभागावर माफियांचा दबदबा आहे, असे ते म्हणाले होते. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे नितीशकुमार यांच्यावरच होता. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या आधीच्या सरकारच्यावेळी समन्वय समिती अस्तित्वात होती. सध्या अशी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे समिती स्थापन करण्याबाबत जेडीयूकडूनच मागणी करण्यास सुरुवात झाली आहे.