नवी दिल्ली : एकीकडे बुधवारी देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे भारताच्या सीमा सुरक्षा दलात ३ नवीन फ्लोटिंग बॉर्डर आउट-पोस्ट जहाजांचा ताफा (बीएसएफ) सामील करण्यात आला. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बीएसएफसाठी ९ फ्लोटिंग बॉर्डर आउट पोस्टपैकी ३ जहाजे त्यांना समर्पित केली आहेत, असे बीएसएफ अधिका-याने सांगितले. नवीन जहाजांच्या ताफ्यात समावेश झाल्याने देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.
एका वरिष्ठ बीएसएफ अधिका-याने सांगितले की, सागरी सीमांचे रक्षण करणे (एफबीओपी) जहाजे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण ते समुद्रात असताना सीमा चिन्हांकित करण्यात मदत करतात. ही जहाजे समुद्रात गस्त घालताना मोठी मदत करतील आणि लहान बोटींना पेट्रोल, पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मदत करतील, असे अधिका-याने सांगितले. तसेच, ते भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवर तैनात केले जातील.
जमीन आणि समुद्र सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण
स्वदेशी बनावटीची सदर जहाजे भारताच्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर धोरणात्मक बेस स्टेशन म्हणून काम करतील. ही जहाजे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत आणि देशाच्या किनारी आणि आंतर्देशीय जलमार्गांद्वारे व्यापाराला चालना देण्यासाठी देखील मदत करतील. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बीएसएफला तीन जहाजे पुरवली आहेत, जी भारत-पाकिस्तानच्या ३३२३ किमी आणि भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेच्या ४,०९६ किमी अंतरावर जमीन आणि समुद्र सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
ताफा बीएसएफकडे सुपूर्द
गेल्या वर्षीच्या सुरुवातीला तीन जहाजांचा ताफा बीएसएफकडे सुपूर्द करण्यात आला होता आणि पुढील तीन जहाजांचा ताफा लवकरच बीएसएफकडे सुपूर्द केला जाईल. जहाजांच्या समावेशामुळे, जहाजांच्या ताफ्याचे संख्याबळ आता १२ वर पोहोचले आहे. ही जहाजे सीएसएलद्वारे डिझाइन केलेली आहेत आणि भारतीय शिंिपग नोंदणीद्वारे वर्गीकृत केली आहेत. प्रत्येक एफबीओपी चार जलद गस्ती नौकांसाठी स्टोरेज सिस्टमसह डिझाइन केलेले आहे.