बागडोगरा: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या जळितकांडामागे कारस्थान असल्याचा दावा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने भाजपच्या आज्ञा पाळल्यास तृणमूल काँग्रेस त्याला विरोध करेल, असा इशाराही दिला आहे.
उत्तर बंगालमधील बागडोगरा येथे एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. टागोर यांचा नोबेल पुरस्कार, नेताजींचा मृत्यू आणी तापसी मलिक प्रकरण यांच्या तपासासह भूतकाळातील घटनामध्ये आम्ही असे पाहिले आहे, की न्याय देण्यात सीबीआय अपयशी ठरले. किंबहुना, विशेष तपास पथकाने अधिक चांगला तपास केला, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. बीरभूम घटनेत तृणमूलच्या एका कार्यकर्त्यांची पक्षाच्याच दुस-या कार्यकर्त्यांने हत्या केली, पण केवळ तृणमूलवरच सर्वत्र टीका केली जात आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.
बीरभूम जळीत कांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी ७ एप्रिलला पुढील सुनावणी होणार असून, त्यापूर्वी तपासाचा प्राथमिक अहवाल सादर करण्यास न्यायालयाने सीबीआयला सागितले आहे. तपासात सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.