बालासोर : भारताने गुरुवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशाच्या बालासोर किना-यावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आजच्या क्षेपणास्त्र चाचणीला खूप महत्व आहे. भारताने आज ओडिशाच्या किनारपट्टीवर ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली. ही चाचणी फार महत्त्वाची आहे. कारण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अनेक नवीन गोष्टींनी सज्ज आहे. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. भारताने चीनला खेटून असलेल्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रत्यक्ष सीमेवर व्यूहरचनेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आधीच तैनात केली आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथंिसह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या तुकडीतील सर्व सदस्यांचे ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीबद्दल ट्विटरवर अभिनंदन केले. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून ब्रह्मोस हे सुपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे क्षेपणास्त्र जगात सर्वाधिक वेगवान आणि लक्ष्याचा अचूक वेध घेणारे आहे. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाला हे क्षेपणास्त्र सुपूर्द करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. गेल्या वर्षी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून याची चाचणी केली असून, ते हवेतून लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम झाले आहे.