24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रभाजप-राष्ट्रवादीत जुंपणार

भाजप-राष्ट्रवादीत जुंपणार

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक १४ ट्विट करत पवारांवर टीका केली आहे. फडणवीस यांनी पवारांच्या भाषणाच्या जुन्या लिंक जोडून त्यावर टीका केली. इशरत जहाँ, १९९३ स्फोट, सच्चर कमिटी तसेच ‘काश्मीर फाईल्स’विषयी पवारांनी घेतलेल्या भूमिकांचा फडणवीसांनी समाचार घेतला आहे.

एका ट्विटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कलम ३७०ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून घेताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या विधानांचाही समाचार फडणवीसांनी घेतला आहे. तसेच नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचेही फडणवीसांनी स्मरण करून देत पवारांवर निशाणा साधला. तसेच अन्य एका ट्विटमध्ये इशरत जहाँ ही निर्दोष होती असे पवारांनी वक्तव्य केल्याच्या बातमीची लिंक पोस्ट करत पवारांवर टीका केली आहे. इतक्यावरच न थांबता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख फडणवीसांनी केला आहे.

फडणवीस यांनी २०१२ मध्ये राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता असताना मुंबईतील आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली गेली यावरूनही बातमीची लिंक पोस्ट करत टीका केली. तसेच आघाडी सरकारने त्यावेळी रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख फडणवीसांनी केला आहे.

तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला. अल्पसंख्याक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, या शरद पवारांच्या वक्तव्याची आठवणही फडणवीसांनी करून दिली. तसेच ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत फडणवीसांनी निशाणा साधला आहे. सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख फडणवीसांनी या १४ ट्विटपैकी एकामध्ये केला आहे.

तसेच १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर १३वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यासंदर्भातही फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘काश्मीर फाईल्स’मध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून?,’’ असा प्रश्न फडणवीसांनी शरद पवारांना विचारला आहे. या ट्विट थ्रेडच्या शेवटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असे फडणवीसांनी म्हटले आहे.

तुम्हाला संविधान हवे की नको? : मिटकरी देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सत्तेत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही कामधंदा उरलेला नाही. त्यामुळेच १४ एप्रिलचे निमित्त साधून त्यांनी ही १४ ट्विट्स केली आहेत. भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष असेल तर त्या पक्षात शाहनवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे काय करत आहेत? भाजपचा मुस्लिमांना विरोध असेल तर याचा अर्थ त्यांना संविधान मान्य नाही. तुम्हाला संविधान हवे की नको, हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असे मिटकरी यांनी म्हटले.

पवारांवर टीका करणे हा काहींचा छंद : वळसे पाटील
या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारे ट्विट करून काहीही फायदा नाही. शरद पवारांवर टीका करणे हा आता सगळ्यांचा आवडता छंद झाला आहे. शरद पवार यांच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या भूमिका वर्षानुवर्षे लोकांना माहिती आहेत. अशा प्रकारचे ट्विट करून त्यात काही फायदा होईल, असे मला वाटत नाही’, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या