24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाभारताचा दणदणीत विजय, मालिकेत बरोबरी

भारताचा दणदणीत विजय, मालिकेत बरोबरी

एकमत ऑनलाईन

कार्तिकची भन्नाट खेळी
राजकोट : मालिकेत पुनरागमन कसे करायचे, याचा उत्तम वस्तुपाठ भारताच्या संघाने घालून दिला. युवा फलंदाजांना लाजवेल, अशी दिनेश कार्तिकची वादळी अर्धशतकी खेळी आणि अवेश खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या सामन्यात ८२ धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे.

यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारताच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घालावे लागले. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळेच भारताला या सामन्यात दणदणीत विजय मिळवता आला. भारताकडून अवेश खानने तिखट मारा करत ४ बळी मिळवले आणि दक्षिण आफ्रिकेला पराभवाच्या दरीत ढकलले. युजुवेंद्र चहलने २ विकेट्स मिळवत त्याला सुयोग्य साथ दिली.

प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. भारताला सलामीवीर ऋतुराजच्या रुपात पहिला धक्का बसला. त्याला पाच धावाच करता आल्या. आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात श्रेयस अय्यर अपयशी ठरला होता. त्यामुळे या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण श्रेयस पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याला फक्त चार धावाच करता आल्या. एकिकडे भारताच्या दोन विकेट्स पडल्या असल्या तरी इशान किशन मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. इशानच्या खांद्यावर भारताच्या धावगतीची जबाबदारी होती. पण इशान २७ धावांवर बाद झाला आणि भारताची धावगती मंदावली. त्यानंतर मैदानात रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे कर्णधार व उपकर्णधार खेळत होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देईल, असे वाटत होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात पंतचा झेल उडाला. पण केशव महाराजने त्याचा झेल सोडला आणि त्याला १५ धावांवर असताना जीवदान मिळाले. पण या जीवदानाचा फायदा पंतला उचलता आला नाही. कारण त्यानंतर पंतने फक्त दोन धावा केल्या आणि १७ धावांवर तो बाद झाला.

टीम इंडिया संकटात असताना दिनेश कार्तिक मदतीला धावून आला. त्याने २७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची वादळी खेळी साकारली. कार्तिकला हार्दिक पांड्याची चांगली साथ मिळाली. हार्दिकने ३१ चेंडूंत ४६ धावांची खेळी साकारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकली. त्यामुळे १६.५ षटकांत ९ बाद ८७ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ८२ धावांनी पराभव झाला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या