५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी
सेंट किटस् : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या टी ट्वेंटी सामन्यात सूर्यकुमार यादव याची जोरदार फटकेबाजी आणि ऋषभ पंत, श्रेयस अय्यरची उपयुक्त खेळी याच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळविला. सूर्यकुमार यादव आज फार्मात होता. अवघ्या ४४ चेंडूत ७६ धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने एक बाजू लावून धरत २६ चेंडूत ३३ धावा काढत ७ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.
भारत-वेस्ट इंडीजमध्ये पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे पार पडला. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजने निर्धारित षटकांत कायले मेयर्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी बाद १६४ धावा केल्या होत्या.
त्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव जोडीने दमदार सुरुवात करून दिली. मात्र, रोहित शर्मा जखमी झाल्याने त्याला निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर श्रेयस अय्यरने सावध खेळ करीत २४ धावांची भर घातली. मात्र, तो लवकर तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु फार्मात असलेला सूर्यकुमार यादव ७६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेला हार्दिक पांड्याही अवघ्या ४ धावा काढून परतला. त्यानंतर ऋषभ आणि दीपक हुडाने (१०) फटकेबाजी करून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.
रोहित शर्माला गंभीर दुखापत
रोहित शर्माने मैदानात उतरताच फटकेबाजी करायला सुरुवात केली. एक षटकार आणि एच चौकार लगावत ५ चेंडूंत ११ धावा केल्या. पण त्यानंतर मैदानात त्याला अस वाटू लागले. त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी मैदानात घाव घेतली. त्यावेळी रोहितला नीट उभे राहता येत नव्हते. कारण रोहितच्या कंबरेतील स्रायू दुखावल्याचे वाटत होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळेच रोहित शर्माने यावेळी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.