कोलंबो : आशिया कप २०२३ च्या सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने भारताचा ६ धावांनी पराभव केला. एकीकडे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. परंतु भारताचा सलामीवीर शुभमन गिलने सुरुवातीपासून चिवट फलंदाजी करीत सर्वांची मने जिंकली. त्याने शतक झळकावत एक वर्ल्ड रेकॉर्ड केला.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा एकमेव फलंदाज मैदानात टिकून राहिला. त्याने या सामन्यात शतक तर झळकावले. पण या शतकासह इतिहासही रचला. अर्थात, गिलने या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडला. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात १ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला. कारण आतापर्यंत जगभरातील कोणत्याही खेळाडूला वनडे क्रिकेटमध्ये वर्षात १ हजार धावांचा टप्पा गाठता आलेला नाही.
तत्पूर्वी बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी २६६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताचा संघ २५९ धावात ऑल आऊट झाला. भारताकडून शुभमन गिलने झुंजार १२१ धावांची शतकी खेळी केली तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. परंतु थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला.