27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाभारताचे आव्हान संपुष्टात

भारताचे आव्हान संपुष्टात

एकमत ऑनलाईन

श्रीलंका विजयी, सुपर-४ मध्ये सलग दुसरा पराभव
दुबई : पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने भारताचा ६ गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले १७४ धावांचे आव्हान श्रीलंकेने ४ गड्यांच्या मोबदल्यात एक चेंडू राखून पार केले. आशिया चषकातील सुपर ४ लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

भारताने दिलेल्या १७४ धवांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. पाथुम निसांकाने ३७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागिदारी केली. श्रीलंकेच्या सलामी फलंदाजांनी भारताविरोधात केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी आहे.

त्यानंतर दासुन शनाका आणि भानुका राजपाक्षे यांनी मोक्याच्या क्षणी नाबाद भागिदारी करत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. दासुन शनाका आणि भानुका राजपाक्षे यांनी ३४ चेंडूत ६४ धावांची भागिदारी केली. दासून शनाकाने कर्णधाराला साजेशी ३३ धावांची खेळी केली तर भानुका राजपाक्षे याने २५ धावा करत कर्णधाराला साथ दिली.

दरम्यान, युजवेंद्र चहलने अचूक टप्यावर गोलंदाजी करत श्रीलंकेची सलामी जोडी फोडली. चहलने १२ व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी ढासळली. चहलने चार षटकार ३४ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. चहलच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा जिवंत झाल्या होत्या. चहलनंतर अश्विननेही विकेट घेत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. पण अखेरच्या चार षटकांत भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सुरुवातीला भारताने नाणेफेकीचा कौल गमावला होता. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या विस्फोटक अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या.

केएल राहुल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहित शर्माने भारताचा डाव सावरला. रोहितने सूर्यकुमार यादवसोबत भारतीय संघाची धावसंख्या वाढवली. रोहित शर्माने ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने चार षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवसोबत ५८ चेंडूत ९७ धावांची भागिदारी केली. रोहित-शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीमुळे भारताचा डाव सावरला.

दोन विकेट लागोपाठ पडल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. सूर्यकुमार यादवने रोहित शर्माला मोलाची साथ दिली. सूर्यकुमार यादवने ३४ धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीदरम्यान सूर्यकुमारने एक चौकार आणि एक षटकार लगावला.

रोहित शर्माने विस्फोटक फलंदाजी करत डाव सावरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे भारतीय संघाचा डाव कोसळला. राहुल ६, विराट कोहली ०, हार्दिक पांड्या १७, ऋषभ पंत १७ आणि दीपक हुडा ३ धावा काढून बाद झाले. ठराविक अंतराने विकेट पडल्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

आशिया चषकातील करो या मरो लढतीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे आशिया चषकाच्या इतिहासात विराट कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने तीन सामन्यात १५५ धावांचा पाऊस पाडला होता. पाकिस्तानविरोधात नुकत्याच झालेल्या सामन्यात विराट कोहलीने दमदार अर्धशतक झळकावले होते. तुफान फॉर्ममध्ये असणा-या विराट कोहलीला दिलशान मदुशंकाने त्रिफाळाचित बाद करत श्रीलंकेला मोठे यश मिळवून दिले.

राहुलचा पुन्हा फ्लॉप शो
दुखापतीनंतर भारतीय संघात स्थान मिळवणा-या राहुलला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. राहुलला आतापर्यंत एकाही सामन्यात अर्धशतकी खेळी करता आली नाही. राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या