पदकसंख्या १६ वर, सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज सहाव्या दिवशी आणखी ४ पदकांची भर पडली. त्यामुळे भारताला मिळालेल्या पदकांची संख्या १६ वर गेली आहे. भारताच्या तुलिका मानने आज जुदोत रौप्य, तर स्क्वॅशमध्ये सौरभ गोषालला कांस्यपदक पटकावले. याशिवाय वेटलिफ्टर लवप्रीत सिंह आणि लॉन बॉल इव्हेंटमध्ये भारताच्या मृदूल बोरगोहेन या दोघांनी कांस्यपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे क्रीडापटू फार्मात असून, आज ४ पदके पटकावल्याने भारताच्या एकूण पदकांची संख्या १६ झाली असून, यामध्ये ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदकाचा समावेश आहे.
जुदो स्पर्धेत ७८ किलो वजनगटात महिला तुलिका मान हिने शानदार कामगिरी बजावली. मात्र, अंतिम सामन्यात तिचा स्कॉटलंडच्या साराकडून पराभव झाला. त्यामुळे तिचे सुवर्णपदक हुकले. परंतु रौप्य पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या लवप्रीत सिंह याने पुरूष गटात १०९ किलो ग्रॅम वजनी गटात कांस्यपदक पटकावले. लवप्रीतने स्नॅचमध्ये १६३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १९२ किलो असे एकूण ३५५ किलो वजन उचलून कांस्यपदकावर कब्जा केला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला हे नववे पदक मिळाले.
स्क्वॅशमध्ये भारताच्या सौरभ घोसालने इतिहास रचत राष्ट्रकुलमधील पहिले वहिले पदक जिंकून दिले. सौरभ घोसालने इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपचा ३-० असा पराभव केला. भारताला स्क्वॅशमध्ये यापूर्वी एकेरीत एकदाही पदक मिळाले नव्हते. मात्र सौरभने पहिले पदक जिंकून दिले. दरम्यान, लॉन बॉल इव्हेंटमध्ये भारताच्या मृदूल बोरगोहेनेही कांस्य पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
पदकतालिकेत भारत ६ व्या स्थानी
भारताने आतापर्यंत १६ पदके जिंकली असून, त्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे.