पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर रात्री उशिरापर्यंत सुरू होता. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर ३१२ धावांचे आव्हान उभे केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात धिम्या गतीने झाली. मात्र, त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन या जोडीने डाव सावरला. रात्री सव्वादोनच्या सुमारास भारताची स्थिती ४ बाद १८४ धावा अशी होती.
वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजच्या फलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवत ५० षटकांमध्ये सहा बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर शाय होपने १३५ चेंडूत ११५ धावांची खेळी केली. विजयासाठी भारतासमोर मोठे आव्हान होते. त्यानंतर मैदानात उतरलेल्या सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवन फार काही कमाल करू शकला नाही. तो अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु तो ४३ धावा काढून बाद झाला.
गिल बाद होताच श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु अय्यर ६३ धावा काढून बाद झाला. तत्पूर्वी सूर्यकुमार यादव अवघ्या ९ धावांवर बाद झाला. वृ्त्त लिहिपर्यंत संजू सॅमसन ४५ धावांवर, तर दीपक हुडा ५ धावाव्ांर खेळत होते.